Ad will apear here
Next
नयनरम्य श्रीवर्धन परिसराची सफर...
‘करू या देशाटन’ या सदरात सध्या आपण रायगड जिल्ह्याची सफर करतो आहोत. गेल्या भागात रायगड किल्ल्याची माहिती घेतली. या वेळी सफर करू या श्रीवर्धन परिसराची....
..........
रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन परिसरावर शिलाहार, यादव, खिलजी, मराठे आणि जास्त करून जंजिऱ्याचा सिद्दी यांची सत्ता होती. पश्चिमेस नितळ समुद्रकिनारे, पूर्वेस रक्षकासारखा उभा सह्याद्री, सावित्री नदीचे सुंदर वनश्रीने नटलेले हे खोरे दृष्टीसुख देते. मुंबई आणि पुण्याला हा भाग खूपच जवळ आहे. निसर्गरम्य ताम्हिणी, वरंधा, आंबेनळी घाटातून पुण्याकडून व सातारा-कोल्हापूरकडून येथे येता येते. मुंबई-गोवा महामार्ग या भागातून जवळून जातो. कोकण रेल्वे आणि जलमार्गही येथे उपलब्ध आहे. 

हरिहरेश्वर किनारा

हरिहरेश्वर :
जेथे सागरा सावित्री मिळते, तेथे हरीचे वास्तव्य असते. पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले हरिहरेश्वर हे ठिकाण दक्षिण काशी समजले जाते. नदीच्या उत्तर तीरावरील हरिहरेश्वर व श्रीवर्धन ही दोन्ही गावे रायगड जिल्ह्यात येतात. हे कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान आहे. एका बाजूला हिरव्यागार, गर्द वनश्रीने नटलेला डोंगर, तर दुसऱ्या बाजूला नयनरम्य स्वच्छ व निळा समुद्र आणि समुद्रात घुसलेल्या, खडकावर आपटणाऱ्या लाटा. 

समुद्रकिनाऱ्यावर बसल्यावर लाटांची गाज कानात घुमू लागते आणि वेगळीच अनुभूती मिळते. या लाटांची लय, सागराचे संगीत ऐकताना मन शांत होते व एक प्रकारचे मेडिटेशन होते. नारळी-पोफळीच्या बागांमध्ये, डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेले हे तीर्थस्थान आहे. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे, तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत.

हरिहरेश्वर मंदिर परिसरकर्नाटकातील गोकर्ण ते ठाणे जिल्ह्यातील निर्मळ हे पाचशे मैलांचे दक्षिणोत्तर अंतर व ४८ मैल रुंद एवढा प्रचंड परिसर हा श्री क्षेत्र हरिहरेश्वराचा परिसर मानण्यात येतो (थोडक्यात सांगायचे तर कोकण). सावित्रीला दिलेल्या वराप्रमाणे ब्रह्मदेवाने सावित्रीसह यज्ञ केला. हरिहरेश्वर क्षेत्राबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी आहे - बळीराजाकडून तीन पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वरापासून सुरू झाले. दुसरी आख्यायिका अशी आहे, की अगस्ती मुनी शांततेच्या शोधात भ्रमण करत होते, तेव्हा हरिहरेश्वरातील चार स्वयंभू लिंगांच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले. 

या हरिहरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला बारा ज्योतिर्लिंग स्थाने आहेत. देशात एकूण १०८ तीर्थस्थाने असली, तरी प्रमुख तीर्थ हरिहरेश्वरमध्ये आहे असे मानले जाते. श्री हरिहरेश्वर महात्म्य पोथीमध्ये हरिहरेश्वरचा महापवित्र क्षेत्र असा उल्लेख आहे. हरिस्वरूप व हरस्वरूप या विष्णू आणि शिव या दोन्हींचा संगम येथे झाला आहे. श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या मध्ये वसले आहे. 

श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे. येथे असलेली काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांची देवळेदेखील महत्त्वाची स्थाने आहेत. येथील मोरगिरी डोंगरातील गुहेत अगस्ती ऋषींचे त्यांची पत्नी लोपामुद्रा हिच्यासह वास्तव्य होते असे मानले जाते. या ठिकाणी वाटाड्या घेऊनच चालत जावे लागते. चंद्रराव मोरे यांनी मंदिराकडून तीर्थाकडे जाणाऱ्या पायऱ्यांचे बांधकाम केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, समर्थ रामदासस्वामी, थोरले पेशवे माधवरावांच्या पत्नी रमाबाई येथे येऊन गेल्याचे उल्लेख आढळतात. 

हरिहरेश्वराचे देऊळ बरेच जुने आहे, ते शिवकालीन असावे असा अंदाज आहे. परंतु, बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही. पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार इ. स. १७२३मध्ये केल्याचे पुरावे आहेत. हरिहरेश्वराच्या परिक्रमेबाबत सावधानता बाळगून जावे. या मार्गावर समुद्राच्या भरतीच्या लाटा येत असतात. त्यामुळे भरतीची वेळ पाहून मगच परिक्रमा (प्रदक्षिणा) करावी. समुद्रावर जाताना पर्यटकांसाठी भरती-ओहोटीचे वेळापत्रक कसे ठरवावे, याचे एक कोष्टक माहिती करून घ्यावे. ज्या दिवशी तुम्ही कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावर असाल, त्या दिवशीच्या तिथीची पाऊणपट करावी. उदा. चतुर्थी असेल, तर त्याची पाऊणपट म्हणजे तीन. त्यात एक आकडा मिळवल्यावर बेरीज चार होते. म्हणजेच चार ही भरतीची वेळ असेल व १२ तासांनी पहाटे चार वाजता ओहोटी होईल. साधारण रोज १५ मिनिटांचा फरक पडत जातो. हरिहरेश्वरलाही छोटा किनारा आहे; पण थोडा लांब आहे. हा किनारा सुंदर आहे. वर्दळही कमी असते. 

हरिहरेश्वर परिक्रमा

श्रीवर्धन :
हे ऐतिहासिक काळापासूनच कोकणातील एक महत्त्वाचे बंदर व व्यापाराचे ठिकाण होते. या परिसरात आढळून येणाऱ्या विष्णूमूर्तींमुळे हा परिसर शिलाहार राजवटीच्या आधिपत्याखाली असावा असे वाटते. कारण विष्णूच्या अशा केशव स्वरूपातील मूर्ती शिलाहार राजवटी जेथे होत्या, तेथे दिसून येतात. त्यांच्यावर थोडी दाक्षिणात्य शैलीची छाप आहे. सोळाव्या शतकात श्रीवर्धन निजामाच्या ताब्यात होते. नंतर ते विजापूरच्या आदिलशहाकडे होते. त्यानंतर हे नगर जंजिऱ्याच्या सिद्दीकडे होते. 

बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे जन्मठिकाणशाहूमहाराजांचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचे हे जन्मगाव आहे. ते श्रीवर्धनचे देशमुख होते. श्रीवर्धनचा तीन किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा सुरक्षित किनाऱ्यांमध्ये गणला जातो. सूर्यास्त बघण्यासाठी हे ठिकाण खूप छान आहे. श्रीवर्धनमधील सोमजाई मंदिर २००-२५० वर्षांपूर्वीचे आहे. अगस्ती मुनींनी याची स्थापना केली, असे मानले जाते. या मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी केला. येथील कोरीव काम व जुन्या काळातील समया बघण्यासारख्या आहेत. सोमजाई मंदिराजवळच बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे जन्मठिकाण आहे. 

येथून पुढे पाणंदीने गेल्यावर श्री लक्ष्मीनारायण मंदिर दिसते. साधारण ११-१२व्या शतकातील शिलाहारकालीन नारायणमूर्ती हे येथील वैशिष्ट्य. काळ्या पाषाणातील दोन फूट उंचीची आखीवरेखीव मूर्ती आवर्जून पाहावी अशी आहे. या मूर्तीची आभूषणे कलात्मक आहेत. सोमजाई मंदिराजवळच तांबडी नावाची टेकडी आहे. येथून परिसराचे विहंगम दृश्य दिसते. 

जीवना बंदराच्या बाजूला जीवनेश्वर मंदिर असून, येथील गाभाऱ्यातील लाकडावरील कोरीव काम खूपच सुंदर आहे. कोळीवाड्यातील राम मंदिर हेही श्रीवर्धनचे आकर्षण आहे. विविध प्रकारच्या विष्णुमूर्ती हे कोकणाचे वैशिष्ट्य आहे. अशीच आणखी एक विष्णुमूर्ती बोर्लीपंचतन गावाकडे जाताना देवखोल येथे आहे. येथे कुसुमेश्वर मंदिर आहे. येथील मूर्ती भग्नावस्थेत असूनही, तिचे सौंदर्य पाहिले, की मूळ मूर्ती किती सुंदर असेल, असे वाटते. कुसुमेश्वराचा हरिहरेश्वर पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे हे मंदिर पुरातन असावे याची खात्री पटते. 

बागमांडला : बागमंडला ते वेसवीदरम्यान फेरीबोट चालते. त्यामुळे आपले वाहन बोटीवर चढवून बाणकोट, केळशी, आंजर्ले, दापोली, दाभोळ यामार्गे गुहागरपर्यंत जाता येते. तसेच बाणकोट व वेळास येथेही जात येते. 

आरावी बीच

आरावी बीच :
श्रीवर्धन ते दिवेआगर हा विलोभनीय किनारी रस्ता आहे. यावर तीन-चार सुंदर सागरकिनारे आहेत. डाव्या बाजूला समुद्रकिनारा उजवीकडे झाडीत लपलेल्या टेकड्या अशा सुंदर पार्श्वभूमीवर प्रवास होतो. श्रीवर्धन सोडल्याबरोबर प्रथम लागतो तो आरावीचा समुद्रकिनारा. आरावी गावात एक जुने देऊळ असून, त्यात भग्न नारायणमूर्ती आहे. अर्थात ही मूर्ती पूर्वी नक्कीच सुंदर असणार. येथील परिसर निसर्गरम्य आहे. 

कोंडिवली बीच

शेखाडी बंदरकोंडिवली बीच : श्रीवर्धनच्या उत्तरेला चार-पाच किलोमीटर अंतरावर हा निसर्गाच्या सान्निध्यात असलेला सुंदर समुद्रकिनारा असून, येथे वॉटरस्पोर्टस् उपलब्ध आहेत. पॅरासेलिंगसारखे खेळही उपलब्ध आहेत. 

शेखाडी बंदर : १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील स्फोटके येथेच प्रथम उतरविली गेली होती. त्यामुळे हे गाव कुप्रसिद्ध झाले. तस्करीसाठीही हे गाव कुप्रसिद्ध होते. शेखाडी हे कोळी लोकांची मोठी वस्ती असलेले ठिकाण आहे. शेखाडीच्या आसपास बीच रिसॉर्टस् आहेत. 

दिवेआगर : २० वर्षांपूर्वी या ठिकाणाचे नाव एकदम सर्वदूर झाले. १७ नोव्हेंबर १९९७ रोजी द्रौपदी धर्मा पाटील यांच्या बागेत झाडांची आळी करताना एक तांब्याची पेटी मिळाली. ही वार्ता त्या इवल्याश्या गावात वाऱ्यासारखी पसरली. गावचे सरपंच, प्रतिष्ठित मंडळी, पोलिस अशा सर्वांसमक्ष पेटीचे कुलूप तोडण्यात आले. आत गणपतीचा शुद्ध सोन्याचा मुखवटा सापडला! बरोबर एक तांब्याचा डबाही होता. त्यात एक किलो ३०० ग्रॅम वजनाचा मुखवटा व २८० ग्रॅम वजनाचे गणपतीचे अलंकार होते. सापडलेली पेटी जमिनीखाली तीन फुटांवर असल्याने सरकारदरबारी जमा करण्याचा प्रश्न नव्हता. ही पेटी मंदिरात ठेवण्यात आली. सापडलेल्या पेटीचे बाबतीत तेव्हाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पुढाकार घेतला. तेव्हाच्या सांस्कृतिक मंत्र्यांना त्यांनी पटवून दिले, की हा सांस्कृतिक ठेवा मूळ ठिकाणीच राहू द्यावा. त्या बदल्यात त्यांनी फक्त एक छोटे श्रेय मागितले. हा मुखवटा जिथे ठेवला होता, त्याच्यावर एक पाटी लिहिली गेली - “महाराष्ट्र राज्याच्या सौजन्याने”. दुर्दैवाने हा ठेवा २४ मार्च २०१२ रोजी चोरीला गेला. नंतर आरोपी सापडले. वितळवलेले सोने मिळाले; पण पहिला बाप्पा मात्र सापडला नाही. 

सुवर्ण गणपती, दिवेआगर

रूपनारायणगणेशाच्या आगमनाने गावाचे भाग्य उजळले. दिवेआगरचा शांत, सुरक्षित सागरकिनारा पर्यटकांना सापडला. रूपनारायण आणि सुंदर नारायण यांच्या सुंदर मूर्तीही प्रकाशाझोतामध्ये आल्या. कोकणातील सर्व विष्णुमंदिरांमध्ये सर्वांत उंच व सुबक मूर्ती रूपनारायणाची समजली जाते. एका अखंड शिळेतून ही मूर्ति घडवली आहे आणि नवल म्हणजे मूर्तीच्या दोन्ही बाजूला चक्क दशावतार कोरले आहेत. हाही एक प्रकारचा खजिनाच आहे. आवर्जून पाहावी अशी ही मूर्ती आहे. रूपनारायण मंदिराजवळ एक सुंदर पायऱ्यांची विहीर आहे. रूपनारायण व सुंदर नारायण यांची मंदिरे नव्याने उभारली आहेत. 

दिवेआगर हे मुळातच संपन्न गाव आहे. गावातील रस्त्यावर चिऱ्यांच्या दगडाची संरक्षक भिंत, त्यामागे मोठे घर, मागे नारळी, सुपारीची व केळीची वाडी. असे सुंदर गाव शोधून सापडणार नाही. बाप्पा प्रकट झाले आणि हे पर्यटनस्थळ म्हणून उजेडात आले. त्यामुळे पर्यटकांसाठी ‘होम-स्टे’ ही संकल्पना आली. पाहुण्यांसाठी सर्व सोयींनी युक्त अशा वेगळ्या खोल्या बांधल्या आहेत. प्रत्येकाकडे नारळ, सुपारी, केळीच्या बागा आहेत. म्हशीही आहेत. त्यामुळे दूध-दुभतंही आहे. कमर्शियल हॉटेल्स त्या मानाने कमी आहेत. 

रूपनारायण मंदिरआसपास आता रिसॉर्टस् होऊ लागली आहेत. येथील मोदक खूप प्रसिद्ध. इतर कोकणी मसाले, पापड, मिरगुंड, पोह्याचे पापड, कडवे वाल वगैरेही मिळतातच. आपले ‘होस्ट’ आपल्या चहा, नाश्त्याची सोय करतात. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही जेवण मिळते. अतिशय रुचकर, गरमागरम जेवण सगळ्यांकडे असते; फक्त आधी सांगावे लागते. 

मजगड : या किल्ल्याला मंदरजगड किंवा मदगड असेही संबोधतात. बोर्लीपंचतन या गावातून येथे चालत जाता येते. किल्ल्यावर आता कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. दिघी खाडी, सागरकिनाऱ्याचे विहंगम दृश्य पाहता येते. थोरले माधवराव पेशवे यांच्या पत्नी १७७२मध्ये हरिहरेश्वरला जात होत्या, त्या वेळी जंजिऱ्याच्या सिद्दीने त्यांना नजराणा पाठविला होता व तोफांची सलामी दिली होती, असे सांगितले जाते. 

आदगाव : दिघीकडे जाताना वेळास, आगरमार्गे गेल्यावर आदगाव हे गाव लागते. येथील समुद्रकिनारा खडकाळ आहे. त्यामुळे लाटांचे तांडव सतत चालू असते. या गावात एक शिवमंदिर आहे व जंगलात देवीचे एक मंदिर आहे. प्रथम कोळीवस्ती लागते. येथेही सागरकिनारी वारकरी संप्रदायाने एक मंदिर बांधले आहे. याच मार्गाने दिघी बंदराकडे जाताना नानवली गाव लागते. या गावी भैरव मंदिर रस्त्यालगत आहे. येथे सागरी दिशादर्शक व किनारा रात्री दिसण्यासाठी एक दीपगृह आहे. या दीपगृहाच्या प्रकाशझोतात रात्रीच्या वेळी मुरूड बंदर, दिघी बंदर व किनारा दिसतो. या दीपगृहाचा प्रकाशझोत गोलाकार फिरतो. हे दृश्य पाहण्यासाठी रात्री दिघी बंदर किंवा या गावी यावे. परंतु केवळ दीपगृह पाहायचे असेल तर दिवसाही जाता येते. 

दिघी बंदर : हे बंदर बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरमार्फत विकसित करण्यात येत आहे. दिघी बंदर ते कोकण रेल्वेचे इंदापूर स्टेशन यांना जोडणारा ४५ किलोमीटरचा नवीन रेल्वेमार्ग मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. दिघी बंदराकडे दिवेआगरकडून येताना समोर समुद्रात अविचल असणारा जंजिरा, पद्मदुर्ग, मुरूड यांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. 

कसे जाल श्रीवर्धन परिसरात?
हरिहरेश्वर ते पुणे १७५ किलोमीटर (ताम्हिणी घाटातून). हरिहरेश्वर ते मुंबई हे अंतर २०० किलोमीटर आहे. पुणे व मुंबई येथे विमानतळ आहेत. जवळचे रेल्वे स्टेशन माणगाव. माणगाव व महाड ही दोन्ही ठिकाणे मुंबई-गोवा महामार्गावर आहेत. हरिहरेश्वर, श्रीवर्धन व दिवेआगर येथे राहण्याची व जेवणाची उत्तम सोय आहे. सागरकिनाऱ्यावर बहुतेक ठिकाणी हॉटेल्स, रिसॉर्टस् आहेत. अतिपावसाचा जुलै महिना सोडला, तर वर्षभर केव्हाही जावे. 

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

(हरिहरेश्वर, श्रीवर्धनबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZOJCB
 Farach Sundar mahiti. Varnan kelya pramane Harihareshwar khup cchan aahe.1
 सारेच लेेख मस्त ! मी आवडीने वाचतो. छायाचित्रे सुरेख. गोकर्ण महाबळेश्वरला पुनः जाउन आल्यासारखे वाटले. बाकी दिवे आगार वगैरे नेहमीतले.
Similar Posts
मुरूड-जंजिऱ्यावर स्वारी ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील तीन भागांमध्ये आपण रायगड जिल्ह्याचा दक्षिण भाग पाहिला. या भागात पाहू या रायगडच्या मध्य किनारपट्टीवरील जंजिरा ते कोर्लई परिसर.
बल्लाळेश्वर, वरदविनायक, बौद्धलेणी आणि बरेच काही... ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीच्या दक्षिण तीरापर्यंतचा भाग पाहिला. या भागात जाऊ या थोडे उत्तरेकडे... सह्याद्रीच्या पायथ्याच्या कडेने....
पेण, पनवेल, उरण, घारापुरी... ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील अष्टागरांची माहिती घेतली. या भागात घेऊ या पेण आणि पनवेल परिसराची माहिती.
सहल महाड परिसराची... ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर ते दिवेआगर या भागाची माहिती घेतली. आजच्या भागात पाहू या रायगड किल्ल्याच्या दक्षिणेकडील महाड परिसर.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language